Other News

हरिभाऊ सोळंखे यांना प्रतिष्ठित “मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती राष्ट्रनिष्ठा व सामाजिक एकता जीवनगौरव पुरस्कार” जाहीर!

हरिभाऊ सोळंखे यांना प्रतिष्ठित “मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती राष्ट्रनिष्ठा व सामाजिक एकता जीवनगौरव पुरस्कार” जाहीर!

बीड (प्रतिनिधी) गेल्या चार दशकांहून अधिक काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून पक्षसंघटन बळकट करणारे, देशातील एकता, अखंडता (हिंदू-मुस्लिम सलोखा) टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक लढा देणारे सादोळा (ता. माजलगाव) येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तथा ज्येष्ठ अभ्यासक हरिभाऊ भगवानराव सोळंखे यांना यंदाचा सर्वोच्च आणि अत्यंत मानाचा “मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती ‘राष्ट्रनिष्ठा व सामाजिक एकता’ जीवनगौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि ६ व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून ‘युवा लोकमित्र परिवार’यांच्या वतीने या ऐतिहासिक पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली.साप्ताहिक युवा लोकमित्र’ आणि ‘युवा लोकमित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात तत्त्वाशी प्रामाणिक राहून आदर्शवत कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वाचा गौरव केला जातो. उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने हरिभाऊ सोळंखे यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक आणि वैचारिक प्रवासाची या सर्वोच्च सन्मानासाठी एकमुखाने निवड केली आहे.
एम. ए. (इतिहास) सारखी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले आणि व्यवसायाने शेतकरी असलेले हरिभाऊ सोळंखे यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी १९८७ ते १९९५ या काळात ‘NSUI’ चे माजलगाव तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना तरुण विद्यार्थ्यांची मोठी फळी निर्माण केली. त्यानंतर १९९५ ते २००१ युथ काँग्रेस तालुकाध्यक्ष, २००१ ते २०१२ तब्बल ११ वर्षे काँग्रेस पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष आणि २०१२ ते २०१५ या काळात बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे सांभाळली.सादोळा ग्रामपंचायत सदस्य ते सादोळा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण भागाचा विकास केला. तसेच संजय गांधी निराधार तालुका कमिटीचे सदस्य म्हणून अनेक वर्ष निराधार व गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकरी पीक कर्ज आणि पीक विम्याच्या कठीण प्रश्नांवर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलने उभारली आहेत.
हरिभाऊ सोळंखे हे केवळ राजकारणी नसून इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. काँग्रेस पक्षाचा खरा आणि गौरवशाली इतिहास तरुणांसमोर मांडण्याचे मोठे काम ते फेसबुकच्या माध्यमातून करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्याच्या’ आवाहनाला ते आपल्या लेखणीतून जनमानसात जागृत करत आहेत.विशेष म्हणजे, देशाचे लाडके पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर त्यांनी लिहिलेले पुस्तक सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे,

सलोखा आणि एकतेचे दूत: हरिभाऊ सोळंखे
हरिभाऊ सोळंखे यांनी समाजात सर्व धर्मीयांमध्ये बंधुभाव आणि सलोखा कायम राहावा यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोणत्याही परिस्थितीत सामाजिक वीण विस्कटणार नाही आणि देशाची अखंडता टिकून राहील, यासाठी त्यांनी दिलेले योगदान सर्वसमावेशक समाजासाठी आदर्शवत आहे. त्यांच्या याच निस्पृह सेवेचा गौरव ‘युवा लोकमित्र’ परिवारातर्फे करण्यात येत आहे.

२० जून रोजी भव्य सोहळ्यात वितरण
हा दिमाखदार आणि वैचारिक गौरव सोहळा शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ‘ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच गरिमामयी उपस्थितीत हरिभाऊ सोळंखे यांच्या प्रदीर्घ राष्ट्रनिष्ठेचा आणि वैचारिक लढ्याचा विशेष गौरव करण्यात येईल.

“हरिभाऊ भगवानराव सोळंखे यांचे कार्य केवळ बीड जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक आहे. ४० वर्षे एकाच विचारसरणीशी प्रामाणिक राहणे, सामाजिक एकता टिकवण्यासाठी कष्ट घेणे आणि आजच्या काळात फेसबुक व पुस्तकांच्या माध्यमातून इतिहासाची पुनर्मांडणी करणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी व काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देताना युवा लोकमित्र परिवाराला सार्थ अभिमान वाटत आहे.”
— शेख ताहेर जाफर (संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड)

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हरिभाऊ सोळंखे यांच्यावर बीड आणि माजलगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, वाचक आणि विविध सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा उत्स्फूर्त वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *